
Image Source:(Internet)
मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात आज, २ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.
दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी मुलीच्या मृत्यूच्या तपासात त्रुटी राहिल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दिशाच्या मृत्यूची नव्याने चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. अखेर बुधवारी न्यायालयाने तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला.
पोलिसांच्या तपासावर उपस्थित झाले होते प्रश्न-
८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून दिशा सालियन यांचा मृत्यू झाला होता. त्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या माजी व्यवस्थापक होत्या. दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही दिवसांनी, १४ जून रोजी सुशांत सिंह राजपूत यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, याबाबत त्यावेळी अनेक चर्चा आणि दावे झाले होते.
मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृत्यूप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास केला होता. मात्र, या तपासाच्या निष्कर्षांवर सतीश सालियन यांनी आक्षेप घेत मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता.
याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने तपासाच्या प्रक्रियेवरही काही प्रश्न उपस्थित केले होते. कुटुंबीयांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त करून तक्रार केली असताना गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल न्यायालयाने केला होता. तसेच अपघाती मृत्यूची नोंद आणि शवविच्छेदन अहवालाच्या प्रती कुटुंबीयांना वेळेत का देण्यात आल्या नाहीत, याबाबतही न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले होते.
आदित्य ठाकरेंच्या नावावरूनही झाला होता युक्तिवाद-
या प्रकरणात आपल्याविरोधात कोणतीही तक्रार नसताना राजकीय हेतूने आपले नाव जोडले जात असल्याचा युक्तिवाद शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता.
आता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय या प्रकरणाचा पुढील तपास करणार आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाबद्दल सतीश सालियन यांनी समाधान व्यक्त करत न्यायालयाचे आभार मानले आहेत. तपास निष्पक्षपणे करून तथ्य समोर आणावे आणि त्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.