नागपुरात गांजा तस्करीचा पर्दाफाश; २० किलो गांजासह चौघे जेरबंद

    02-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजा तस्करीचे जाळे उघडकीस आणले आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल २० किलो गांजा जप्त करण्यात आला. जप्त गांजाची किंमत सुमारे १० लाख २८ हजार रुपये आहे.

ताजनगर-टेका परिसरातील मुस्लिम कब्रस्तानासमोरील सार्वजनिक सिमेंट रस्त्याजवळ संशयित हालचाली आढळून आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीदरम्यान आरोपींकडून मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. या कारवाईत गांजासह कार, ऑटोरिक्षा आणि चार मोबाईल फोन असा एकूण १८ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणात शेख इम्रान उर्फ बाबा, शेख आबिद उर्फ अबू, फैजान रजा आणि मोहम्मद जुनेद यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर हॅप्पी उर्फ पाजी उर्फ हरप्रीत सैनी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, काही आरोपींविरुद्ध यापूर्वीही अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. शेख इम्रानचे अमली पदार्थ प्रकरणातील आरोपी अनिस ड्रम याच्याशी नातेसंबंध असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजा कुठून आणण्यात आला, तो कोणाला पुरवठा केला जाणार होता आणि या तस्करीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.