
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या लाडू प्रसादासाठी वापरण्यात आलेल्या तुपातील कथित भेसळप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. ‘सुक्रिती फूड्स’चा प्रवर्तक कैलाश चंद मंगला याला मनी लाँडरिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. १७ सप्टेंबर रोजी त्याला ताब्यात घेतल्यानंतर विशाखापट्टणम येथील विशेष PMLA न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
ईडीच्या तपासानुसार, तिरुपती देवस्थानला पुरवण्यात येणाऱ्या गाईच्या तुपात कथितरित्या पाम तेल, पाम कर्नल ऑइल आणि विविध रासायनिक घटकांचा वापर करण्यात आला. या मिश्रणाला गाईच्या तुपासारखा रंग, सुगंध आणि पोत देण्यात आल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.
२०१९ ते २०२४ दरम्यान TTD ला सुमारे २३० कोटी रुपयांच्या तुपाचा पुरवठा झाल्याचे तपासात समोर आले आहे. यापैकी सुमारे ९६ कोटी रुपयांचे कथित बनावट तूप मंगलाच्या कारखान्यात तयार करण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे. हा प्रकार लपवण्यासाठी विविध कंपन्यांच्या माध्यमातून व्यवहार आणि कागदपत्रांचा वापर केल्याचेही तपास यंत्रणेने म्हटले आहे.
या प्रकरणात यापूर्वी ‘भोले बाबा ऑरगॅनिक डेअरी मिल्क’चे संचालक विपिन जैन यालाही ईडीने अटक केली आहे. कथित भेसळ आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.