पावसाने पुन्हा धरला जोर; मुंबई-पुण्यासह मराठवाडा, विदर्भात सरी, शेतकऱ्यांना दिलासा

    19-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

महाराष्ट्र : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यातील अनेक भागांत पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबईतील पवई परिसरासह काही भागांत सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असून पुढील काळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भंडारा जिल्ह्यात तब्बल आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे पुनरागमन झाले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांनाही या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

हवामानातील बदलामुळे राज्यातील काही भागांत पावसाचे वातावरण तयार झाले आहे. मराठवाड्यापासून कर्नाटकपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा विस्तारल्याने पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.

मात्र, विदर्भातील अनेक भाग अद्याप दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज असून तापमान ३४ ते ३५ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. पावसातील खंडामुळे शेती पिकांवर परिणाम होण्याची चिंता कायम आहे.