
Image Source:(Internet)
पुणे : लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. १८ जून रोजी घडलेल्या या घटनेनंतर सुरुवातीला अपघाती मृत्यूचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र तपासानंतर पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावर कट रचून हत्या केल्याचा आरोप केला असून, दोघांविरोधात मोठ्या प्रमाणात पुरावे गोळा करण्यात आल्याचे समोर आले आहे.
२ हजारांहून अधिक पानांचे दोषारोपपत्र-
पुणे ग्रामीण पोलीस शनिवारी, १९ सप्टेंबर रोजी वडगाव मावळ न्यायालयात २ हजारांहून अधिक पानांचे दोषारोपपत्र दाखल करणार असल्याचे वृत्त आहे. या दोषारोपपत्रात सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल रेकॉर्ड, वैद्यकीय अहवाल, घटनास्थळावरील पुरावे तसेच डिजिटल आणि फॉरेन्सिक पुराव्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
तपासादरम्यान सिया आणि चेतन यांच्यातील कथित चॅट्स पोलिसांनी रिकव्हर केल्याचेही समोर आले आहे. याशिवाय लोहगड किल्ल्यावर पोलिसांनी घटनाक्रमाचे रिक्रिएशन केले होते. आरोपींच्या मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा आणि इतर डिजिटल पुरावेही तपासण्यात आले आहेत. पोलिसांच्या मते, या सर्व पुराव्यांमधून घटनाक्रमाची साखळी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हत्येपूर्वीच कटाची तयारी केल्याचा पोलिसांचा दावा-
तपासात सिया आणि चेतन यांनी केतनला लोहगडावर नेऊन त्याच्या मृत्यूला अपघाताचे स्वरूप देण्याची योजना आखल्याचा पोलिसांचा आरोप आहे. यापूर्वीही लोहगडावर जाऊन घटनास्थळाची पाहणी केल्याचे आणि कथितरित्या तयारी केल्याचे तपासात समोर आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, दोन्ही आरोपींनी चौकशीदरम्यान एकमेकांवर कटाचा आरोप केल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे दोषारोपपत्रात कोणते पुरावे आणि कोणती भूमिका मांडली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे. या प्रकरणातील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत तपासले जाणार आहेत.