
Image Source:(Internet)
नागपूर : मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या कायापालटाला वेग देण्याच्या दृष्टीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ‘नागपूर स्पोर्ट्स हब’च्या प्रगतीसोबतच संकुलातील विविध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.
स्पोर्ट्स हबअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ११ प्रेक्षागृहांच्या कामाची सरासरी ४४ टक्के प्रगती झाली आहे. यातील स्पोर्ट्स कॅफेटेरियाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, ऑलिम्पिक आकाराच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाचे कामही सुरू आहे. जुन्या झाडांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रकल्पाच्या आराखड्यात आवश्यक बदल करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
भविष्यातील गरजा लक्षात घेऊन स्पोर्ट्स हबचे नियोजन करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. संकुलात उच्च दर्जाचे पथदिवे, सौर ऊर्जा प्रणाली, सीसीटीव्ही आणि अद्ययावत विद्युत व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. विविध आंतरराष्ट्रीय निकषांनुसार करण्यात येणाऱ्या सुधारणांमुळे प्रकल्पाची सुधारित किंमत १,१४४.३६ कोटी रुपये झाली आहे.
याशिवाय जुन्या इनडोअर हॉलचे नूतनीकरण, वुडन फ्लोअरिंग, वातानुकूलन, अग्निशमन यंत्रणा, ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक आणि पॅव्हेलियनच्या अद्ययावतीकरणासाठी ९१.८८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. ‘मिशन लक्षवेध’अंतर्गत स्पोर्ट्स सायन्स सेंटर, विभागीय निपुणता केंद्र आणि राज्यस्तरीय बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.