
Image Source:(Internet)
नागपूर : गोवंशाची कथित अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर यशोधरानगर पोलिसांनी कारवाई करत ४ गायी आणि एका वासराची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी टाटा वाहनासह तब्बल ३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांच्या नाईट पेट्रोलिंग पथकाला १८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ऑटोमेटिक चौक परिसरातील ओबेरॉय पॅलेसजवळ संशयास्पद वाहन आढळले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये ४ गायी आणि एक वासरू आढळून आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, जनावरांना वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात दाटीवाटीने वाहून नेले जात होते. त्यांना कत्तलीसाठी नेले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गोवंशाची किंमत सुमारे ८५ हजार रुपये, तर वाहनाची किंमत सुमारे ३ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी उत्तमनगर, गोरेवाडा येथील राकेश मनोज यादव (४०) याच्याविरुद्ध यशोधरानगर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.