
Image Source:(Internet)
नागपूर : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाअभावी पिकांवर संकट ओढावले असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केली.
नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना पटोले यांनी कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीचा दाखला देत महाराष्ट्र सरकारवर प्रश्न उपस्थित केला. कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांसाठी उपाययोजना सुरू केल्या, मग महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्यास विलंब का होत आहे, असा सवाल त्यांनी केला. केंद्र आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असतानाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
शरद पवार यांनी दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकारला पत्र दिले असून विरोधकांनी यापूर्वी राज्यपालांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिल्याचे पटोले यांनी सांगितले. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमधील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले. धान खरेदी केंद्रांवरील कथित गैरप्रकारांचे पुरावे विधानसभेत मांडल्याचा दावाही त्यांनी केला.
महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाचा परिणाम राज्याच्या कारभारावर होत असल्याचा आरोपही पटोले यांनी यावेळी केला.