
Image Source:(Internet)
नागपूर : कळमना परिसरातील गोदाम फोडून लाखो रुपयांची सुपारी चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी छडा लावला आहे. या कारवाईत पाच संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुपारीसह दोन चारचाकी वाहने आणि मोबाईल असा २६ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पावनगाव येथील डी.के. फार्मजवळ कॅपिटल ट्रेडर्सचे गोदाम आहे. १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान चोरट्यांनी गोदामाचे कुलूप तोडून सुमारे १८ लाख रुपयांची सुपारी आणि डीव्हीआर लंपास केला. याप्रकरणी गोदाम मालक हनीफ किडिया यांनी कळमना पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, टोल नाक्यांवरील कॅमेरे आणि संशयित वाहनांच्या हालचाली तपासण्यास सुरुवात केली. तांत्रिक तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत नितेश भवरिया, शुभम मराठे, मोहम्मद शहजाद उर्फ अतीक, मोहम्मद इरफान उर्फ बाबा आणि अरविंद बंटी येडा यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून १६ लाख २७ हजार रुपयांची चोरीची सुपारी, दोन चारचाकी वाहने आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. आरोपींच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. टोळीतील आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.