पेंशन कार्डच्या नावाने फसवणूक! नागपुरात निवृत्त कर्मचाऱ्याला साडेपाच लाखांचा ऑनलाइन गंडा

    18-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : पेंशन कार्ड तयार करून देण्याच्या बहाण्याने सायबर ठगांनी एका निवृत्त कर्मचाऱ्याला साडेपाच लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. लिंक पाठवून बँक खाते आणि डेबिट कार्डशी संबंधित माहिती मिळवल्यानंतर आरोपींनी खात्यातील रक्कम ऑनलाइन वळती केल्याचे समोर आले आहे.

श्रीनगर येथील इम्प्रेस मिल सोसायटी परिसरात राहणाऱ्या ६० वर्षीय निवृत्त बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याला १६ सप्टेंबर रोजी अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण पेंशन कार्डच्या प्रक्रियेशी संबंधित असल्याचे सांगितले. त्यानंतर पेंशन कार्ड बनवून देण्याच्या नावाखाली आरोपीने त्यांना एक लिंक पाठवली आणि त्यावर आवश्यक माहिती भरण्यास सांगितले.

तक्रारदाराने लिंक उघडून बँक खाते व डेबिट कार्डशी संबंधित माहिती भरली. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून तब्बल साडेपाच लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोबाइल क्रमांक धारक आरोपीविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, मोबाइल क्रमांक आणि ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.