दुष्काळाच्या संकटात सरकारची लगबग; पालकमंत्र्यांना जिल्ह्यांत जाऊन शेतीची पाहणी करण्याचे आदेश

    18-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची कमतरता जाणवत असल्याने शेतीसमोरील संकट वाढले आहे. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हानिहाय परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधित विभागांना तातडीने आवश्यक माहिती संकलित करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सर्व पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन शेतजमिनींची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आमदारांनीही मतदारसंघात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा आणि त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.

सध्या विविध जिल्ह्यांमध्ये शेतीच्या नुकसानीसह पावसाच्या स्थितीचे सर्वेक्षण सुरू आहे. संबंधित विभागांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी कोणत्या उपाययोजना करायच्या, याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

कृत्रिम पावसाची मागणी फेटाळली
पावसाअभावी काही भागांत कृत्रिम पावसाची मागणी होत असली तरी बावनकुळे यांनी त्यावर सावध भूमिका घेतली. कृत्रिम पावसाचे प्रयोग यापूर्वी अपेक्षित यश मिळवू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परतीच्या पावसाला अद्याप वेळ असल्याने त्यातून पावसाची भरपाई होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, ‘महाखनिज 2.0’च्या माध्यमातून राज्यातील गौण खनिज व्यवहारांवर लक्ष ठेवले जाणार आहे. अवैध वाहतूक रोखण्यासाठी नियम अधिक कडक करण्यासह गौण खनिज नियमावलीत बदल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.

याआधी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत दुष्काळ जाहीर करण्याची गरज व्यक्त केली होती. काही जिल्ह्यांचा दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.