
Image Source:(Internet)
पंजाब : भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याने पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पठाणकोट जिल्ह्यातील बटाला परिसरातील घासीपूर गावाजवळ ही घटना घडली. बिट्टू यांच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या ताफ्यावर अंडी, टोमॅटो आणि दगडफेक केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांच्या कारच्या काचा फुटल्याचे सांगण्यात येत आहे.
बिट्टू यांनी या घटनेसाठी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आरोप केला आहे. “माझ्यावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिसांत तक्रार दिली आहे,” असे बिट्टू यांनी म्हटले. आरोपींवर गुन्हा दाखल करून कारवाई होईपर्यंत आपण घरी जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पठाणकोटमध्ये अंमली पदार्थांविरोधात मोर्चा काढण्यात येणार होता. हा मोर्चा रोखण्यासाठीच हल्ला करण्यात आल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा जय इंदर कौर यांनी केला. भाजप नेते विजय सांपला यांनीही पंजाबमधील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.