
Image Source:(Internet)
छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या उत्साहात गणपतीची आरती केल्यानंतर प्रसाद म्हणून एरंडाच्या बिया खाल्ल्याने १३ मुलांना विषबाधा झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील कापूस वडगाव येथे घडली. विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्यानंतर सर्व मुलांना तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी शाळेला सुट्टी असल्याने गावातील काही मुलांनी एकत्र येत मातीच्या गणपतीची स्थापना केली. त्यानंतर गणपतीची आरती करण्यात आली. आरतीनंतर प्रसादासाठी खाद्यपदार्थ उपलब्ध नसल्याने मुलांनी परिसरात असलेल्या एरंडाच्या बिया प्रसाद म्हणून खाल्ल्या.
काही वेळातच मुलांना उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला. एकाच वेळी अनेक मुलांची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केल्यानंतर मुलांची प्रकृती स्थिर झाली.
या घटनेनंतर लहान मुलांनी अनोळखी बिया, फळे किंवा वनस्पतींचे भाग खाण्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. खाद्यपदार्थ आहे की नाही, याची खात्री नसताना कोणतीही बिया किंवा वनस्पती खाणे धोकादायक ठरू शकते.