
Image Source:(Internet)
नागपूर : यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर शुल्क लावण्याचा निर्णय झाल्यास त्याचा थेट भार सामान्य ग्राहकांवर पडेल, असा दावा त्यांनी केला.
‘दोन हजार रुपयांच्या यूपीआय व्यवहारावर १२ रुपये शुल्क आकारले जाणार असेल, तर हा पैसा व्यापारी ग्राहकांकडूनच वसूल करणार. मग ही सामान्यांच्या डोळ्यात धूळफेक नाही तर काय?’ असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. एक लाख रुपयांच्या व्यवहारावर ६०० रुपये शुल्क आकारले जाणार असल्यास, जनतेच्या व्यवहारातून पैसा वसूल करण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार यांनी केंद्राच्या आर्थिक धोरणांवरही निशाणा साधला. देशाची अर्थव्यवस्था आणि बँकिंग व्यवस्थेबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर टीका केली. गरिबांकडून पैसा घेऊन उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करत, उद्योगपतींच्या १६ लाख कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
सोयाबीननंतर धानाचेही संकट; सरकारला घेरण्याची तयारी-
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून धानाचे पीकही करपण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याची आणि तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करीत होते. मात्र सत्तेत आल्यानंतर सर्वेक्षण आणि पडताळणीनंतर निर्णय घेण्याची भाषा केली जात असल्याची टीका त्यांनी केली.
रोहित पवार यांच्यासह आपण दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करत असल्याचे सांगत, गणेशोत्सवानंतर राज्यभर दौरे आणि आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.