हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; शिंदेंचा हवाई प्रवास टळला, रस्तेमार्गे अहमदाबादकडे रवाना

    17-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

अहमदाबाद : गुजरात दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड आढळल्याने त्यांचा नियोजित हवाई प्रवास रद्द करण्यात आला. वडनगरहून अहमदाबादला जाण्यापूर्वी हेलिकॉप्टरची तपासणी करताना ही बाब समोर आली.

बिघाड लक्षात आल्यानंतर पायलटने हेलिकॉप्टरचे उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिंदे यांनी हेलिकॉप्टरऐवजी रस्तेमार्गाने अहमदाबादकडे जाण्याचा निर्णय घेतला. ते गाडीने नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मस्थळ असलेल्या वडनगर येथे ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत आयोजित कार्यक्रमासाठी शिंदे गुजरातमध्ये गेले होते. कार्यक्रमानंतर वडनगरहून अहमदाबादला हेलिकॉप्टरने जाण्याचे नियोजन होते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे हे नियोजन बदलावे लागले.

यापूर्वीही शिंदे यांच्या हेलिकॉप्टर प्रवासात अडथळे आले आहेत. मे २०२६ मध्ये मुंबईहून मुरबाडला जात असताना खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा मार्ग बदलून ते जुहू येथे सुरक्षित उतरवण्यात आले होते. ऑक्टोबर २०२४ मध्येही खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. २०२३ मध्येही हवामानामुळे हेलिकॉप्टरचा मार्ग बदलून मुंबईला परतावे लागले होते.