जरांगे-शिंदेंमधील विसंवाद दूर होण्याची चिन्हे; प्रताप सरनाईकांचा दावा

    17-Sep-2026
Total Views |
 
Pratap Sarnaik
 Image Source:(Internet)
 
धाराशिव : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात निर्माण झालेला विसंवाद आता हळूहळू दूर होण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच दोघांमधील गैरसमज पूर्णपणे दूर होतील, असा दावा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केला.
 
मनोज जरांगे पाटील दिवसातून दोन ते तीन वेळा दूरध्वनीवरून आपल्याशी संपर्क साधतात आणि विविध कामे सांगतात. ही कामे तत्काळ पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करतो, असे सरनाईक यांनी सांगितले.
 
दरम्यान, मराठवाड्यात आठ ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम असतानाही धाराशिवमध्ये आपल्याला विरोध करण्यात आला. मात्र, हा विरोध समाजाच्या भावना व्यक्त करणारा होता. त्यामुळे त्या भावना आपण समजून घेतल्या, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
 
मनोज जरांगे पाटील यांचा जसा आदर आहे, तसाच एकनाथ शिंदे यांचाही आदर आहे, असे सांगत जरांगे यांनी शिंदे यांच्यावर टीका केल्यामुळे आपल्याला त्यावर बोलावे लागले, असे सरनाईक म्हणाले.
 
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तसेच आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या हितासाठी अनेक निर्णय घेण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.