
Image Source:(Internet)
नाशिक : आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरून आंदोलनाला आता अधिक तीव्र वळण मिळण्याची शक्यता आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी पाठिंबा दिल्याची माहिती आंदोलक विद्यार्थी ललित चौधरी यांनी दिली.
आदिवासी विकास विभागाचे आयुक्त आणि सचिव यांची गणेश विसर्जनापर्यंत हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे. ही कारवाई न झाल्यास आदिवासी विकास मंत्र्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ललित चौधरी यांनी दिला.
आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी अभिजीत दीपके यांनी सुरू केलेल्या अभियानात त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांसोबत सहभागी व्हावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच आदित्य ठाकरे, रोहित पवार आणि राहुल गांधी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी त्यांच्यासोबत दौरा करावा, असे आवाहन आंदोलकांकडून करण्यात आले.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण, सुविधा आणि मूलभूत प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात येत आहे.