दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षांच्या तारखा जाहीर

    17-Sep-2026
Total Views |
 
10th and 12th-grade
 Image Source:(Internet)
 
मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या (Students) परीक्षेचे नियोजन आता निश्चित झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२६-२७ शैक्षणिक वर्षातील बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. गुरुवारी १७ सप्टेंबर रोजी मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या.
बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. त्याआधी २० जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातील.
दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ दरम्यान पार पडणार आहे. तर दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत घेण्यात येतील.
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांच्या अंतर्गत या परीक्षा होणार आहेत.
दरवर्षी साधारण जुलै किंवा ऑगस्टमध्ये संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जाते. मात्र, यंदा सप्टेंबरमध्येच परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे योग्य नियोजन करता यावे आणि परीक्षेची तयारी अधिक प्रभावीपणे करता यावी, यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, दहावी-बारावीचे निकाल साधारणतः मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतात. तसेच अनुत्तीर्ण आणि श्रेणीसुधारासाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा साधारण जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जाते.