
Image Source:(Internet)
नागपूर : गौरी विसर्जनासाठी तलावावर गेलेल्या दोन १३ वर्षीय मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काटोल तालुक्यातील झिल्पा येथे घडली. आयुष हरीश कुमरे आणि दर्शन धनराज लाड अशी मृत मुलांची नावे असून, दोघेही कबड्डी खेळत होते.
मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजता गावातील महिला आणि मुले गौरी विसर्जनासाठी तलावावर गेले होते. विसर्जनाची प्रक्रिया सुरू असतानाच आयुष आणि दर्शन पाण्यात बुडाल्याचे लक्षात आले. दोन्ही मुले बुडत असल्याचे दिसताच त्यांच्या काकांनी प्रसंगावधान राखत तलावात उडी घेतली आणि त्यांना बाहेर काढले.
त्यानंतर दोन्ही मुलांना तातडीने काटोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची बातमी गावात पसरताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण झिल्पा गावात शोककळा पसरली आहे.
घटनेची नोंद काटोल पोलिसांनी घेतली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.