
Image Source:(Internet)
गोंदिया : सडकर-अर्जुनी तालुक्यातील झुरकुटोला परिसरात वाघाच्या हल्ल्यात ७२ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत शेतकऱ्याची ओळख वातू बकाराम राऊत अशी झाली आहे. या घटनेनंतर झुरकुटोला तसेच आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वातू राऊत हे गुरुवारी सकाळी घरातील शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी झुरकुटोला येथील डोंगराळ जंगल परिसरात गेले होते. हा परिसर FDCMच्या कंपार्टमेंट क्रमांक ५२४ अंतर्गत येतो. चारा गोळा करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राऊत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी गावात धाव घेतली आणि वन विभाग तसेच पोलिसांना याबाबत कळवले. माहिती मिळताच वन विभागाचे पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरात वाघाच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.
या घटनेमुळे जंगलालगतच्या गावांमध्ये वाघाच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिसरात वन विभागाने गस्त वाढवावी आणि वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.