नागपूरसह विदर्भातील ४ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; पुढील २४ तास ‘यलो अलर्ट’

    16-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : विदर्भावर पुन्हा पावसाचे सावट निर्माण झाले असून, भारतीय हवामान विभागाने नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांसाठी पुढील २४ तास ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भातील वातावरणात बदल झाल्याने काही भागांत अचानक पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पावसासोबत वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः वीज चमकत असताना झाडे, विजेचे खांब आणि मोकळ्या मैदानांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोकणातही पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह कोकणातील अनेक भागांत १९ सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार सरींसह मेघगर्जना होण्याचा अंदाज आहे.

नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरातही पावसाचा जोर जाणवण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये १६ सप्टेंबरला हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, तर पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात १६ आणि १७ सप्टेंबरला हलका पाऊस, तर काही भागांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

अहिल्यानगर आणि जालन्यातही पावसाची शक्यता कायम आहे. अहिल्यानगरमध्ये पुढील काही दिवस हलका पाऊस आणि मेघगर्जना होऊ शकते. जालना जिल्ह्यात पुढील २४ तासांत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता असून, त्यानंतर हवामान तुलनेने कोरडे राहण्याचा अंदाज आहे.