महावितरणचा नवा नियम! थकीत वीजबिलावर आता कर्मचारी नाही, थेट सर्व्हरवरून वीजपुरवठा बंद

    16-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : महावितरणच्या वीजग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. थकीत वीजबिलाची वसुली अधिक जलद आणि डिजिटल पद्धतीने करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया स्वयंचलित करण्याची नवी प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बिल थकल्यानंतर वीज कापण्यासाठी कर्मचाऱ्यांना ग्राहकाच्या घरी जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

नव्या व्यवस्थेत मुख्य सर्व्हरच्या माध्यमातून थकीत बिल असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा दूरस्थ पद्धतीने बंद केला जाणार आहे. मात्र, ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे थकीत रक्कम भरल्यानंतर वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याची प्रक्रियाही जलद करण्यात आली आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने बिल भरल्यानंतर साधारण ३० मिनिटांत वीजपुरवठा पूर्ववत होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ग्राहकांना बिलाची मुदत संपताच अचानक वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी स्वयंचलित कारवाई दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजल्यानंतर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिलाची अंतिम तारीख लक्षात घेऊन वेळेत बिल भरणे आवश्यक ठरणार आहे.

दरम्यान, ग्रामीण भागात अद्याप अनेक ग्राहक कागदी वीजबिलांवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत डिजिटल पद्धतीने होणाऱ्या स्वयंचलित कारवाईमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नव्या प्रणालीमुळे वीजबिल वसुलीला वेग येणार असला, तरी ग्राहकांना योग्य वेळी माहिती आणि सूचना मिळणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.