मनोज जरांगे पाटील मोजक्या सहकाऱ्यांसह मुंबईकडे रवाना; ६४८ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

    15-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

वडीगोद्री (जि. जालना) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील अखेर बुधवारी मोजक्या सहकाऱ्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले. उपोषणाचा १८ वा दिवस असताना त्यांनी मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासनाची धावपळ वाढली असून, त्यांच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी आरोग्य तपासणी झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासह गावातील दोन मंदिरांत दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले. जरांगे पाटील यांचे हे ११ वे उपोषण असून, मुंबईकडे जाण्याची ही तिसरी वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे.

६४८ पोलिसांचा तगडा बंदोबस्त-
जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी ते शहागड या मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये ३ उपविभागीय पोलिस अधिकारी, १० पोलिस निरीक्षक, ३० सहायक व उपनिरीक्षक, ३०० पोलिस अंमलदार, २६५ होमगार्ड आणि आरसीपीच्या दोन प्लाटूनचा समावेश आहे. एकूण ६४८ पोलिस कर्मचारी आणि अधिकारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

अंतरवाली सराटी, वडीगोद्री, धुळे-सोलापूर महामार्गावरील डावा कालवा, वडीगोद्री टी-पॉईंट उड्डाणपूल, राजस्थानी हॉटेल, गहिनीनाथ नगर, महाकाळा, अंकुशनगर आणि पैठण फाटा (शहागड) या प्रमुख ठिकाणी पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे.

ताफ्यात दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका-

जरांगे पाटील यांच्या ताफ्यात एक डिफेंडर आणि एक फॉर्च्युनर अशी दोन वाहने असून, त्यांच्यासोबत दोन रुग्णवाहिकाही ठेवण्यात आल्या आहेत. जालना पोलिसांच्या दोन अंगरक्षकांव्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगरच्या अतिरिक्त स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे (SPU) अंगरक्षकही त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

जरांगे पाटील यांच्यासोबत श्रीराम कुरणकर, सरपंच पांडुरंग तारख, बद्रीनाथ तारख, स्वप्निल तारख, संजय कटारे, गंगाधर काळकुटे, किशोर बलांडे आणि गणेश काळे हे मोजके सहकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

घोषणांनी परिसर दणाणला-

जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून रवाना होताच त्यांच्या समर्थनार्थ उपस्थित हजारो समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं”, “आता कुठं जायचं? मुंबईला जायचं!”, “एक मराठा, लाख मराठा” आणि “लढेंगे, जितेंगे” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे कूच करण्याच्या निर्णयामुळे आगामी काळात मराठा आरक्षण आंदोलनाला कोणते वळण मिळते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.