राजस्थानात भाजपचा वरचष्मा राहणार; दहा पैकी आठ महापौर भाजपचे होतील, बावनकुळेंचा दावा

    15-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : राजस्थानातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळेल, असा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राजस्थानातील एकूण ३१८ महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींपैकी सुमारे २३९ ठिकाणी भाजपची सत्ता स्थापन होईल. तसेच राज्यातील दहा महानगरपालिकांपैकी आठ ठिकाणी भाजपचे महापौर विराजमान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंगळवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी राजस्थानातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. विरोधकांना जनतेने नाकारले असून, भाजपच्या विकासाच्या अजेंड्याला मतदारांचा पाठिंबा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

युवकांनी काँग्रेसला नाकारल्याचा दावा-

राजस्थानमध्ये काँग्रेसकडून ‘झेन झी’ अर्थात तरुण मतदारांची दिशाभूल करून राजकीय वातावरण आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप बावनकुळे यांनी केला. ‘वंदे मातरम्’च्या पूर्ण घोषणेवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट नसल्याने तरुणांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. काँग्रेसची भूमिका युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विरोधकांना नाकारल्याचे बावनकुळे म्हणाले.

दिशा सालियन प्रकरणावर भाष्य टाळले-
दिशा सालियन प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला असता बावनकुळे यांनी सावध भूमिका घेतली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर सविस्तर भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

समान नागरी कायद्याची गरज-

देशात समान नागरी कायदा लागू करण्याची आवश्यकता असल्याचेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. कायद्याच्या दृष्टीने देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळणे गरजेचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

कल्याण जमीन प्रकरणाचा अहवाल आल्यानंतर स्पष्टीकरण-
कल्याणमधील प्रीमियर लँड जमीन प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा आपण विधानसभेतच केली होती, असे बावनकुळे यांनी सांगितले. एसआयटीचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत विधानसभेत सविस्तर स्पष्टीकरण दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.