मान्सूनच्या परतीचे संकेत; महाराष्ट्रात कुठे मुसळधार पावसाचा अंदाज?

    15-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्यात सध्या काही भागांत पावसाचा जोर कायम असतानाच नैऋत्य मान्सूनच्या परतीचे संकेत मिळू लागले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, १९ सप्टेंबर २०२६ च्या आसपास पश्चिम राजस्थानातून मान्सून माघारी फिरण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची वेगवेगळी स्थिती पाहायला मिळणार आहे.

दक्षिण-पूर्व राजस्थान आणि त्यालगतच्या उत्तर गुजरात परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. या हवामान प्रणालीमुळे गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत अतिमुसळधार पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

या हवामान प्रणालीशी संबंधित चक्रीय वाऱ्यांची स्थिती झारखंड, मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगडपर्यंत विस्तारली आहे. त्याचवेळी उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात तसेच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागातही वरच्या वातावरणात चक्रीय वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा-
कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव सौराष्ट्र आणि कच्छ भागात विशेष जाणवण्याची शक्यता आहे. कच्छ, मोरबी, जामनगर, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जुनागढ, गिर सोमनाथ आणि राजकोट या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह काही ठिकाणी अचानक पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात कुठे किती पाऊस?
महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि गोवा परिसरात १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान अनेक ठिकाणी पावसाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे.

विदर्भात १४ आणि १५ सप्टेंबरला व्यापक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर तुलनेने कमी राहणार असून काही ठिकाणी हलक्या किंवा तुरळक सरी पडू शकतात.

मान्सूनची माघार लवकरच-
यंदाच्या पावसाळ्यात देशभरात सरासरीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान नोंदवण्यात आले आहे. आतापर्यंत देशात सरासरीच्या सुमारे ८४ टक्के पाऊस झाला असून, त्यामुळे देशातील जवळपास ३९ टक्के भूभागावर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सप्टेंबरमधील पावसाकडून शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या अपेक्षा असतानाच आता मान्सूनच्या परतीचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात उर्वरित काळात पावसाचे प्रमाण कसे राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.