
Image Source:(Internet)
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर देश-विदेशातून लाखो अनुयायी दाखल होतात. मात्र, एवढ्या मोठ्या गर्दीच्या तुलनेत पाणी, निवारा, स्वच्छतागृहे, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांची पुरेशी व्यवस्था होत नसल्याने अनुयायांना दरवर्षी गैरसोयींना सामोरे जावे लागते. यंदा ही परिस्थिती टाळण्यासाठी दीक्षाभूमी परिसरात जागतिक दर्जाच्या सुविधा उभाराव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे सिद्धांत पाटील यांनी याबाबत नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. दीक्षाभूमी स्मारक समिती, महापालिका आणि संबंधित विभागांकडे सातत्याने मागण्या करूनही त्यांची पुरेशी दखल घेतली जात नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
समाजकल्याण विभागाच्या दीक्षाभूमी परिसरातील प्रशस्त भवनाचा उपयोग अनुयायांच्या निवासासाठी करावा. तसेच अन्न, पाणी आणि आरोग्य सेवांसाठी उपलब्ध यंत्रणा प्रभावीपणे वापरावी, अशी मागणी करण्यात आली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी वेळेआधीच सुरू करून अर्धवट बांधकामे पूर्ण करावीत आणि परिसरातील जमीन समतल करावी, जेणेकरून पावसात चिखल व अव्यवस्था निर्माण होणार नाही, अशीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी धम्मदीप लोखंडे, धीरज सोनटक्के, साहिल डोंगरे आदी उपस्थित होते.