कौटुंबिक वादाने त्रस्त युवक टॉवरवर चढला; नागपूरच्या अहिंसा चौकात चार तास थरार

    15-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : सिव्हिल लाइन्समधील अहिंसा चौक परिसरात मंगळवारी एका युवकाने मोबाईल टॉवरवर चढून घेतल्याने परिसरात मोठी गर्दी झाली. सुमारे चार तास चाललेल्या प्रयत्नांनंतर पोलिस आणि अग्निशमन विभागाच्या बचाव पथकाने युवकाला सुरक्षित खाली उतरवले.

किशोर उर्फ मोनू सिन्हा, असे या युवकाचे नाव असून तो छत्तीसगडमधील दुर्ग येथील रहिवासी आहे. तो नागपुरात एकटाच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कुटुंबातील वाद आणि मालमत्तेवर अन्य व्यक्तीने केलेल्या कथित कब्जामुळे तो मानसिक तणावात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

युवक टॉवरवर चढल्याची माहिती मिळताच अंबाझरी पोलिस आणि मनपा अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधत खाली उतरण्याची विनंती केली. मात्र, बचाव पथक त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करताच तो टॉवरच्या आणखी वरच्या भागात जात होता. त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली.

दरम्यान, युवकाने अन्न आणि पाण्याची मागणी केली. पोलिसांनी त्याला ते उपलब्ध करून देत संवाद कायम ठेवला. अखेर योग्य संधी साधून बचाव पथकातील जवान टॉवरवर चढले आणि युवकाला ताब्यात घेत सुरक्षितपणे खाली आणले.

खाली उतरल्यानंतर युवकाला पाणी देण्यात आले. पुढील चौकशीसाठी त्याला अंबाझरी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. उप-अग्निशमन अधिकारी दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बचाव मोहिमेत सुमारे चार तासांच्या प्रयत्नांनंतर युवकाचे प्राण वाचवण्यात यश आले.