
Image Source:(Internet)
नागपूर : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तपासाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणाची चौकशी सीबीआय आणि न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू असून तपासात कोणतेही सत्य दडपले जाणार नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवरही सरकारचे लक्ष असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. राज्यातील १८ जिल्ह्यांचा आढावा घेऊन तयार करण्यात आलेला अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर केला जाणार आहे. अहवालावर सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
समान नागरी कायद्यावरूनही बावनकुळे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार आणि समान कायदा मिळणे आवश्यक असल्याने समान नागरी कायदा ही काळाची गरज आहे, असे त्यांनी म्हटले. UCC राजकीय हेतूने आणला जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांनाही त्यांनी खोडून काढले.
राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीचे त्यांनी स्वागत केले. राजस्थानच्या जनतेने काँग्रेसच्या राजकारणाला नाकारत विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य दिल्याचा दावा बावनकुळे यांनी केला.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे निघालेल्या मोर्चाबाबत प्रश्न विचारला असता बावनकुळे यांनी भाष्य करण्याचे टाळले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सरकारची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे, असे सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.