
Image Source:(Internet)
नागपूर :छिंदवाडा जिल्ह्यातील कुकडीखापा धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या नागपूरच्या चार तरुणांवर रविवारी अचानक संकट कोसळले. धबधब्याच्या परिसरात वरच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि चारही जण चट्टानांमध्ये अडकून पडले. जीव मुठीत धरून मदतीची वाट पाहत असलेल्या तरुणांना अखेर SDRFच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले.
श्याम बोरकर (२५), अथर्व ओके (२२), मनीष उइके (२५) आणि सतीश बावने (२३) हे कुकडीखापा धबधबा पाहण्यासाठी गेले होते. धबधब्याच्या मध्यभागातील खडकांवर ते गेले असताना अचानक पाण्याचा वेग वाढला. काही वेळातच पाण्याची पातळी आणि प्रवाह इतका वाढला की त्यांना परतीचा मार्ग गाठणे शक्य झाले नाही. त्यामुळे चौघेही चट्टानांवर अडकून राहिले.
पोलिसांकडून SDRFला पाचारण-
तरुण अडकल्याची माहिती मिळताच उमरानाला चौकीचे प्रभारी अधिकारी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, खोल दरी आणि वेगाने वाहणारे पाणी पाहता बचावकार्य धोकादायक होते. परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने SDRF पथकाला पाचारण करण्यात आले.
रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचल्यानंतर जवानांनी विशेष बचाव साहित्याच्या मदतीने मोहीम सुरू केली. रस्स्यांच्या साहाय्याने सुमारे १५० फूट खोल दरीत उतरून जवान तरुणांपर्यंत पोहोचले. पाण्याचा धोका लक्षात घेऊन लाइफ जॅकेट आणि लाइफ बॉयचा वापर करण्यात आला. त्यानंतर मोठ्या दक्षतेने चारही तरुणांना एकामागोमाग सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले.
दीड तास चालली धडकी भरवणारी मोहीम-
SDRF कंपनी कमांडर गणेश कुमार धुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे २ वाजता तरुण अडकल्याची माहिती मिळाली. त्यानंतर रेस्क्यू पथक आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी रवाना झाले. सुमारे तासाभरात पथक घटनास्थळी पोहोचले. दुपारी ३ ते ३.१५ वाजण्याच्या सुमारास बचावकार्य सुरू करण्यात आले. जवळपास दीड तास अथक प्रयत्न केल्यानंतर चौघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
या थरारक बचावकार्यामुळे चारही तरुणांना जीवदान मिळाले. पावसाळ्यात धबधबे आणि जलप्रपातांच्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह अचानक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यटकांनी केवळ निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षेला प्राधान्य देऊन धोकादायक खडक, दऱ्या आणि पाण्याच्या प्रवाहापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.