गणरायाच्या आगमनात पटोलेंचा सरकारवर निशाणा; महागाई, आरक्षण अन् दुष्काळावरून घेरले

    14-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : गणेश चतुर्थीच्या निमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छा देत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. गणरायाने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-समाधान आणावे आणि नागरिकांचे दुःख दूर करावे, अशी प्रार्थना करतानाच त्यांनी महागाई, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, मराठा आरक्षण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले.

सर्वसामान्यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. महागाई आटोक्यात आणण्यात सरकार अपयशी ठरल्याने गोरगरिबांसाठी सण साजरा करणेही कठीण झाले आहे, अशी टीका पटोले यांनी केली. सरकारने महागाई कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या असत्या, तर सामान्य कुटुंबांनाही गणेशोत्सवाचा आनंद अधिक उत्साहात घेता आला असता, असे त्यांनी म्हटले.

निवडणुकीच्या तोंडावर समान नागरी कायद्याचा मुद्दा
समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरूनही पटोले यांनी भाजपला लक्ष्य केले. निवडणुका जवळ आल्या की जनतेच्या मूलभूत प्रश्नांपासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी समान नागरी कायद्याचा मुद्दा पुढे केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भारतीय संविधानाने नागरिकांना समान अधिकार दिले आहेत. त्यामुळे भाजपने आधी समान नागरी कायद्याचा मसुदा जाहीर करावा आणि त्यानंतर त्यावर चर्चा करावी, असे आव्हान त्यांनी दिले.

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही भाष्य केले. सत्ताधाऱ्यांच्या काळात गुंडगिरी वाढल्याचा आरोप करत नागरिकांना धमकावण्याचे प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा धाकच राहिला नसेल, तर सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे पटोले म्हणाले.

मराठा आरक्षणावर सरकारला कोंडीत पकडले

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट उत्तर मागितले. २०१४ पूर्वी भाजपने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचेही सांगितले होते. आज केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असतानाही हा प्रश्न कायम का आहे, असा सवाल पटोले यांनी केला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यात अडथळा नेमका कोणता आहे आणि भाजपला निर्णय घेण्यापासून कोणी रोखले, हे फडणवीस यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. मराठा आणि ओबीसी समाजातील संघर्षामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होत असून सरकारने हा प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शेतकरी संकटात; महाराष्ट्रात तातडीने दुष्काळ जाहीर करा

राज्यातील पावसाची स्थिती आणि शेतकरी आत्महत्यांवरूनही पटोले यांनी सरकारवर टीका केली. कर्नाटकात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे; मात्र महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही सरकार निर्णय घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

पोळ्यासारख्या शेतकऱ्यांच्या सणाच्या दिवशीही आत्महत्या होत असतील, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. बीड, जालना यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असून सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी पटोले यांनी केली.

सत्ताधाऱ्यांतील वादावरूनही टोला
गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांवरून पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. सत्तेतील नेतेच एकमेकांवर गंभीर आरोप करत असतील, तर संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. “तीन तिघाडा, काम बिघाडा” अशी राज्यातील सत्तेची परिस्थिती असल्याचा टोला लगावत महाराष्ट्राच्या हिताऐवजी राज्याची लूट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

नरेंद्र मेहता प्रकरणातही सरकारकडे उत्तराची मागणी
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित कथित जमीन प्रकरणावरूनही पटोले यांनी सरकारला घेरले. या प्रकरणात विधानसभेत पुराव्यांसह प्रश्न उपस्थित केल्याचा दावा त्यांनी केला. सरकारी तसेच खासगी जमिनींच्या कथित गैरव्यवहारासंदर्भातील पुरावे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सादर केल्याचे पटोले यांनी सांगितले.

मात्र, एवढे करूनही संबंधित प्रकरणात कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित करत सरकारने याबाबत जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.