
Image Source:(Internet)
नागपूर : शहरात अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने पाचपावलीतील बुद्धनगर परिसरात कारवाई करत एका युवकाला अटक केली. अनुराग रामटेककर (२३) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून, त्याच्याकडून १२.६५० ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली. या कारवाईत मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि मेस्ट्रो मोपेड असा एकूण ९३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंमली पदार्थविरोधी पथक बुद्धनगर परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना एमडीच्या विक्रीबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे प्रीतमसिंग ठाकूर यांच्या घरासमोर पोलिसांनी सापळा रचला. काही वेळाने मेस्ट्रो मोपेडवरून तेथे आलेल्या अनुरागच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्याने पथकाने त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे जिपलॉक पिशवीत एमडी पावडर आढळून आली. वजन केल्यानंतर त्याचे प्रमाण १२.६५० ग्रॅम असल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक चौकशीत अनुरागने हा अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने आणल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
तपासादरम्यान या प्रकरणात जावेद खान (३०), हसनबाग आणि चंदा ठाकूर, शांतिनगर यांची नावे समोर आली आहेत. दोघांचा या प्रकरणातील सहभाग तपासला जात असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
पाचपावली पोलिसांनी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेला एमडी नेमका कुठून आणण्यात आला, त्याची विक्री कोणाला केली जाणार होती तसेच या प्रकरणामागे आणखी कोणते रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई डीसीपी दीपक अग्रवाल आणि एसीपी वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थविरोधी पथकाने केली.