बहुतांश मागण्या मान्य, आता कायद्याच्या चौकटीतच निर्णय;जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर फडणवीसांचं विधान

    14-Sep-2026
Total Views |
मुख्यमंत्र्यांचा आंदोलनाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला

Image Source:(Internet)

नागपूर :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मुंबईत आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. आझाद मैदान पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील मुंबईकडे जाण्यावर ठाम आहेत. ते उद्यापासून मुंबईच्या दिशेने निघणार असून, सुमारे पाच दिवसांनी मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्व मागण्या पूर्ण झाल्या आहेत. काही मागण्या न्यायालयात असून, काही विविध टप्प्यांवर आहेत. या मागण्यांबाबत न्यायालयीन आणि घटनात्मक प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. कायद्याच्या बाहेर जाऊन कोणतीही मागणी मान्य करता येणार नाही. मात्र, सरकारने चर्चेची दारे बंद केलेली नाहीत आणि राज्यघटनेनुसार ज्या गोष्टी करता येणे शक्य आहे, त्या करण्यास सरकार तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सध्या गणेशोत्सवाचा पर्व सुरू असल्याने आंदोलनामुळे गणेशभक्तांना कोणतीही असुविधा निर्माण होऊ नये, असेही फडणवीस यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या काळात आंदोलन करणे योग्य नाही, याचा जरांगे पाटील यांनी पुनर्विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्री निवासस्थानी गणरायाची स्थापना केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. उत्सवादरम्यान प्रदूषण कमी ठेवण्यासोबतच पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

दरम्यान, ब्रिक्स बैठकीतील मांसाहारी पदार्थांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ब्रिक्स हे जेवण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठीचे व्यासपीठ नसून ग्लोबल साऊथचे महत्त्वाचे फोरम आहे, असे ते म्हणाले. दिल्ली डिक्लरेशनवर सर्व देशांची सहमती होणे आणि चीनने पाकिस्तानविरोधातील भूमिकेचा समावेश असलेल्या घोषणापत्रावर स्वाक्षरी करणे, हे भारताचे मोठे राजनैतिक यश असल्याचा दावा फडणवीस यांनी केला.