‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात नागपूरसह राज्यभरात बाप्पाचे जल्लोषात आगमन

    14-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : गणेश चतुर्थीनिमित्त आज, १४ सप्टेंबर रोजी नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला असून, ढोल-ताशांचा गजर, फुलांची आकर्षक सजावट आणि भक्तिमय वातावरणात घराघरांत तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे.

नागपुरातील अनेक प्रमुख गणेश मंडळांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि उत्सवाचे नियोजन सुरळीत करण्यासाठी बाप्पाचे आगमन यापूर्वीच भव्य मिरवणुकांद्वारे केले होते. त्यामुळे आज शहरातील विविध भागांत सकाळपासूनच गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे, यंदा जवळपास नऊ वर्षांनंतर १२ दिवसांचा गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह असून, पुढील काही दिवस शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी होत असून, विघ्नहर्त्या गणरायाच्या दर्शनासाठी भक्त मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. महाराष्ट्रभर ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात भक्ती आणि उत्साहाचा माहोल निर्माण झाला आहे.