
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांचा पाच दिवसांचा संयुक्त लष्करी सराव संपताच उत्तर कोरियाने पुन्हा एकदा क्षेपणास्त्र चाचणी घेतली. उत्तर कोरियाने पूर्व किनाऱ्यावरील वॉनसान परिसरातून समुद्राच्या दिशेने अनेक कमी पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या लष्कराने दिली आहे.
दक्षिण कोरियाच्या संयुक्त लष्करी प्रमुखांच्या माहितीनुसार, ही क्षेपणास्त्रे सुमारे २५० किलोमीटर अंतरापर्यंत गेली. या प्रक्षेपणानंतर दक्षिण कोरियाने आपल्या देखरेख यंत्रणेला अधिक सतर्क केले असून, अमेरिका आणि जपानसोबत माहितीची देवाणघेवाण सुरू ठेवली आहे.
अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांचा ‘फ्रीडम एज’ हा पाच दिवसांचा संयुक्त लष्करी सराव शुक्रवारी पूर्ण झाला. या सरावात हवाई, सागरी आणि सायबर क्षेत्रातील विविध कवायती करण्यात आल्या. उत्तर कोरिया या सरावाला आपल्या देशाविरोधातील चिथावणीखोर कारवाई आणि संभाव्य हल्ल्याची तयारी मानतो.
दरम्यान, उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र प्रक्षेपणामुळे अमेरिकेच्या भूभागाला किंवा तिच्या मित्रराष्ट्रांना तातडीचा धोका नसल्याचे अमेरिकेच्या पॅसिफिक कमांडने स्पष्ट केले आहे. मात्र, दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाला क्षेपणास्त्र चाचण्या थांबवण्याचे आवाहन केले आहे.
सुमारे तीन आठवड्यांनंतर उत्तर कोरियाने केलेली ही पहिली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणी असल्याचे सांगितले जात आहे. संयुक्त लष्करी सरावाला उत्तर देताना उत्तर कोरियाने यापूर्वीही अशा प्रकारच्या क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत.