
Image Source:(Internet)
कोल्हापूर : “आमची माधुरी आम्हाला परत आणून द्या” अशी मागणी करणाऱ्या कोल्हापूरकरांची लाडकी माधुरी हत्तीण अखेर नांदणीत परतली आहे. गुजरातमधील वनतारा रेस्क्यू सेंटरमध्ये देखभाल केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून माधुरीला पुन्हा नांदणीत आणण्यात आले.
माधुरीने तब्बल ४८ तासांचा प्रवास करत मुंबई आणि पुणेमार्गे नांदणी गाठली. रात्री उशिरा तिचे आगमन होताच गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. माधुरीच्या स्वागतासाठी गावात पोस्टर लावण्यात आले होते. वनतारा रेस्क्यू सेंटरचे संस्थापक अनंत अंबानी यांचे आभार मानणारे फलकही लावण्यात आले होते. माधुरी नांदणीत पोहोचताच कोल्हापूरकरांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.
माधुरीच्या पुनर्वसनासाठी नांदणीमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मोकळे वातावरण, मऊ वाळू, विशेष फरशी, पाण्यात व्यायामासाठी जलाशय तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. तिच्या पायांची व सांध्यांची नियमित तपासणी, आरोग्य निरीक्षण आणि गरजेनुसार उपचार केले जाणार आहेत.
माधुरीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वनताराकडूनही आवश्यक सहकार्य केले जाणार आहे. वनताराच्या सहकार्याबद्दल गावकऱ्यांनी संस्थेचे आभार मानले. राजू शेट्टी यांनीही वनताराच्या भूमिकेचे कौतुक करत नांदणीमध्ये ‘मिनी वनतारा’ उभारल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, माधुरीच्या देखभालीसाठी उच्चस्तरीय समितीने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. माधुरीचा मिरवणूक, परेड, धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन अथवा भीक मागण्यासाठी वापर करता येणार नाही. १८ वर्षांखालील मुले तसेच प्रशिक्षित नसलेल्या व्यक्तींना तिच्याशी शारीरिक संपर्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. वन्यजीव कायदे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणेही बंधनकारक असेल.
माधुरी ही कोल्हापूरकरांसाठी केवळ हत्तीण नसून नांदणीशी जोडलेले भावनिक नाते आहे. त्यामुळे तिची घरवापसी कोल्हापूरकरांसाठी आनंदाचा आणि भावनिक क्षण ठरला.