दहीहंडी, मारबत मिरवणुकीतील डीजेचे व्हिडिओ न्यायालयात सादर; आयोजकांवर कारवाईचे आदेश

Image Source:(Internet)
नागपूर : डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कठोर भूमिका घेतली आहे. त्रिमूर्तीनगर नगर मंडळाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान दहीहंडी आणि मारबत मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याचे व्हिडिओ तसेच प्रसारमाध्यमांतील वृत्ते न्यायालयासमोर सादर करण्यात आली. या पुराव्यांच्या आधारे संबंधित आयोजकांवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
केवळ अधिसूचना काढून उपयोग नाही, तर ध्वनीप्रदूषण आणि डीजेशी संबंधित नियमांची प्रत्यक्षात काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही, याची प्रशासनाने खात्री करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये डीजेवरील निर्बंध आणि ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. तसेच न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या व्हिडिओ आणि वृत्तांच्या आधारे संबंधित आयोजकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना डीजेवरील निर्बंधासंदर्भातील अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले असून, या प्रकरणी २२ सप्टेंबरपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
याचिकाकर्त्याचे वकील अॅड. तुषार मंडलेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या प्रकरणाची माहिती दिली.