दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; थेट बांधावर जाऊन होणार पिकांच्या नुकसानीची पाहणी

    12-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : पावसाअभावी उभी पिके करपून गेल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासन आणि मुख्य सचिवांना पीक नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

पावसाने पाठ फिरवल्यामुळे ज्या भागातील पिके वाळून गेली आहेत, त्या शेतकऱ्यांना नियमांनुसार नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाणार आहे. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पथकांकडून हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर नुकसानीच्या प्रमाणानुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

मराठवाड्यात प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात-
मराठवाड्यात प्रमाणपत्र वाटप सुरू असल्याबाबतही बावनकुळे यांनी माहिती दिली. प्रमाणपत्र वाटपासाठी यापूर्वीही विविध ठिकाणी शिबिरे घेण्यात आली होती. शासनाच्या नियमानुसार अशा शिबिरांचे आयोजन करणे ही सरकारची धोरणात्मक प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.

ओबीसींच्या मागण्या अद्याप शासनाकडे नाहीत-
ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, माध्यमांमधून काही मागण्या मांडल्या गेल्या असतील; मात्र अधिकृत स्वरूपात त्या अद्याप शासनाकडे प्राप्त झालेल्या नाहीत. मागण्या प्राप्त झाल्यानंतर त्या संबंधित समितीसमोर मांडून त्यावर योग्य तो विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राजस्थानमध्ये मोठ्या विजयाचा दावा-
राजस्थानमधील आगामी निवडणुकांबाबतही बावनकुळे यांनी आत्मविश्वास व्यक्त केला. राजस्थानमधील दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. या सर्व ठिकाणी भाजपला विजय मिळेल, असा दावा त्यांनी केला. १४ तारखेला अपेक्षेपेक्षा मोठा विजय पाहायला मिळेल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.