
Image Source:(Internet)
नागपूर : शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठा तोटा झाल्यानंतर कर्ज फेडण्यासाठी एका २८ वर्षीय युवकाने बँक लुटण्याचा धक्कादायक प्रयत्न केला. बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकत त्याने ४ लाख ५३ हजार रुपयांची रोकड लंपास केली. मात्र, पोलिसांची सतर्कता आणि तातडीच्या कारवाईमुळे त्याचा डाव काही वेळातच उधळला गेला.
सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडे प्लॉट चौक येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. सूरज बोरकर (२८, रा. तातोली, भिवापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो बीएससी पदवीधर असून सध्या बेरोजगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सूरजने शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी सुमारे ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, बाजारातील गुंतवणुकीत नुकसान झाल्याने कर्ज फेडणे त्याच्यासाठी अडचणीचे ठरले. त्यानंतर कर्ज फेडण्यासाठी बँकेतून रोकड लुटण्याचा कट त्याने आखल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तो बँकेच्या बाहेरील रोख भरणा यंत्राजवळ दबा धरून बसला होता. बँकेचे कर्मचारी यंत्रातून रोकड घेऊन शाखेत जात असताना त्याने अचानक त्यांच्या दिशेने मिरची पूड फेकली. कर्मचाऱ्यांचा प्रतिकार झुगारून देत त्याने ४ लाख ५३ हजार रुपये ताब्यात घेतले आणि तेथून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलिसांनी तातडीने परिसरात शोधमोहीम सुरू केली. मारबत उत्सवामुळे परिसरात पोलिसांचा बंदोबस्त आणि गस्त सुरू होती. याचवेळी टप्पूलाल चुटे, राजेंद्र मोहोड, शैलेश बेलेकर आणि शरदसिंग टेंभरे या पोलिस कर्मचाऱ्यांना एनआयटी उद्यानाजवळ संशयित युवक पळताना आढळला.
पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लुटीची संपूर्ण ४ लाख ५३ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच लुटीचा कट नेमका कसा आखण्यात आला, याचा तपास सक्करदरा पोलीस करीत आहेत.