
Image Source:(Internet)
काँगो : काँगोमधील बुकावू शहरात गुरुवारी हृदयद्रावक दुर्घटना घडली. एका घरातून सुरू झालेल्या आगीने जवळच्या दोन शाळांना वेढले. या भीषण आगीत २६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १९ मुली आणि ७ मुलांचा समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, घराला लागलेली आग काही वेळातच शाळांच्या परिसरात पोहोचली. आगीचा धूर आणि वाढत्या ज्वाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेबाहेर पडण्याचा प्रयत्न केला; मात्र अरुंद मार्गामुळे मोठी चेंगराचेंगरी झाली.
या गोंधळात काही विद्यार्थ्यांनी खिडक्यांमधून बाहेर पडण्यासाठी उड्या मारल्या, तर अनेक विद्यार्थी दरवाजाकडे धावले. धुरामुळे काही विद्यार्थ्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
दक्षिण किवू प्रांतीय प्रशासनाने २६ विद्यार्थ्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. या दुर्घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सुरू असून दुर्घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.