वाशिममध्ये शिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनींच्या विनयभंगाचा आरोप; ५७ वर्षीय शिक्षकाला अटक

    11-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींच्या विनयभंगाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ५७ वर्षीय शिक्षक दिलीप बोरकर याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, आरोपी शिक्षक तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थिनींना शिकवण्याच्या कारणावरून स्वतःजवळ बोलावत होता. याच दरम्यान एका ९ वर्षीय विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थिनीने घडलेला प्रकार एका महिला शिक्षिकेला सांगितल्यानंतर प्रकरण पालकांच्या निदर्शनास आले.

यानंतर संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी शाळेत धाव घेत आरोपी शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, शिक्षकाकडून यापूर्वीही काही विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची पोलीस चौकशी करत असून, प्रकरणाची सविस्तर माहिती तपासानंतर समोर येणार आहे.