नाव, पैसा आणि यश मिळवायचंय? प्रेमानंद महाराजांनी सांगितले भाग्य बदलण्याचे २ मार्ग

    11-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

वृंदावन: आयुष्यात नाव, पैसा, प्रतिष्ठा आणि यश मिळावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, यश मिळवण्यासाठी केवळ मेहनतच नव्हे, तर योग्य आचरण आणि सकारात्मक विचारांचीही गरज असते. वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज आपल्या प्रवचनांतून भक्तांना याच जीवनमूल्यांची जाणीव करून देतात. त्यांच्या मते, जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत—निःस्वार्थ सेवा आणि सतत ईश्वराचे नामस्मरण.

निःस्वार्थ भावनेने सेवा करा
प्रेमानंद महाराजांच्या मते, जीवनात प्रगती साधायची असेल तर निःस्वार्थ भावनेने सेवा करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. आई-वडील, गुरू, गरजू, असहाय्य व्यक्ती, रुग्ण तसेच प्राणी-पक्ष्यांची कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा करावी, असा त्यांचा संदेश आहे.

सेवा करताना केवळ धन देणेच महत्त्वाचे नसून शरीर, मन, वाणी आणि आपल्या क्षमतेनुसार इतरांच्या उपयोगी पडणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता गरजू व्यक्तीला मदत केल्याने चांगल्या कर्मांची सवय लागते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो, असे महाराज सांगतात.

ईश्वराच्या नामाचे सतत स्मरण करा
प्रेमानंद महाराजांच्या मते, परिस्थिती कितीही कठीण असली तरी व्यक्तीने ईश्वराचे नामस्मरण सोडू नये. त्यांच्या मते, भगवंताचे नामस्मरण आणि चिंतन हेच जीवनातील खरे धन आहे.

पैसा, संपत्ती आणि ऐश्वर्य जीवनात कितीही मिळाले तरी ते कायमस्वरूपी सोबत राहत नाही. त्यामुळे सांसारिक सुखांपेक्षा ईश्वरावरील श्रद्धा आणि भक्तीला महत्त्व द्यावे, असा संदेश ते आपल्या प्रवचनांतून देतात.

महाराजांच्या मते, निःस्वार्थ सेवा आणि ईश्वराचे नामस्मरण या दोन्ही गोष्टी जीवनात अंगीकारल्यास मनाला शांतता मिळण्यास आणि सकारात्मक बदल घडण्यास मदत होते. त्यामुळे यशाच्या मागे धावताना केवळ पैसा आणि प्रसिद्धीच नव्हे, तर चांगले आचरण, सेवा आणि अध्यात्मिक समाधान यांनाही महत्त्व द्यावे, असा त्यांचा संदेश आहे.