भंडाऱ्यात महामार्गावर काळाचा घाला; तीन मुलांसह ८ जणांचा मृत्यू, ३ गंभीर

    11-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

भंडारा : नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. पिंपळगाव रस्त्यावरील भाऊ का ढाब्याजवळ ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये झालेल्या जोरदार धडकेत तीन मुलांसह आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

धडक इतकी जबरदस्त होती की अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

जखमी तिघांना तातडीने साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, भंडारा पोलीस अधीक्षकांनी आठ जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

अतिवेगामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.