जरांगे मुंबईत येण्याआधीच सरकारची धावपळ; उदय सामंत म्हणाले, ‘१२ सप्टेंबरची वाट कशाला?’

    10-Sep-2026
Total Views |
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी सरकारचे प्रयत्न; ‘त्याआधीच उपोषण थांबवण्याचा प्रयत्न करू’

Image Source:(Internet)

नंदुरबार
: मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला असून, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. उपोषणाच्या १३व्या दिवशी जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीवर तोडगा न निघाल्यास १२ सप्टेंबरनंतर मुंबईत येण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत मोठे विधान केले आहे.

“१२ सप्टेंबरची वाट कशाला? त्याआधीच मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करू,” असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. शासनाच्या वतीने जरांगे यांनी उपोषण थांबवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी महायुती सरकार कुठेही कमी पडत नसल्याचा दावा सामंत यांनी केला. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजाच्या हक्कांवर कोणताही परिणाम होणार नाही, याची सरकारकडून पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

निजामकालीन नोंदींच्या आधारे मराठा-कुणबी संदर्भातील नोंदी शोधून काढण्यात आल्या असून, त्यानुसार प्रमाणपत्रे दिली जात असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले. “कोणाच्याही ताटातील काहीही काढून मराठा समाजाला दिले जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, याची काळजी आंदोलनकर्त्यांनी आणि मनोज जरांगे यांनी घ्यावी, असे आवाहनही उदय सामंत यांनी केले.

जरांगे पाटील यांच्या मुंबईतील संभाव्य आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून त्यांचे उपोषण थांबवण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे सामंत यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.