
Image Source:(Internet)
नागपूर : शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्यावर निशाणा साधला. महामार्ग उभारणीची प्रक्रिया आणि रस्त्याच्या बांधकामाचा खर्च याबाबतची वस्तुस्थिती रोहित पवारांना माहिती आहे. मात्र, त्यानंतरही ते समाजात नकारात्मक वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.
महामार्गाच्या कामासाठी माती, मुरूम तसेच अन्य आवश्यक बाबींवर खर्च करावा लागतो. प्रत्येक रस्त्याचे बांधकाम मानक आणि त्यानुसार अंदाजपत्रक वेगळे असते. शक्तिपीठ महामार्गाचे काम पूर्ण नियोजनाने केले जाणार असून, शासनाचा आणि जनतेचा पैसा वाया जाऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष काळजी घेतल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. भविष्यात भ्रष्टाचाराला कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, पावसाने पाठ फिरवलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल शासनाने घेतली आहे. ज्या भागात पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले आहे, तेथे सर्वेक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाकडून संयुक्तपणे पाहणी केली जाणार असून, नुकसानीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर शेतकऱ्यांना नियमानुसार मदत दिली जाईल.
अमरावतीतील घटनेप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. प्राथमिक चौकशीनंतर संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रुग्णालयांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यावर शासनाचा भर असेल. लहान बाळांच्या उपचार केंद्रांचे आधुनिकीकरण करण्यासाठीही योजना तयार केली जात असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
हायकोर्टाने उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत पोलिसांनी चौकशी पूर्ण करून अहवाल तयार केला आहे. न्यायालयाच्या निरीक्षणानुसार पोलीस आपली भूमिका मांडतील. चौकशी निष्पक्षपणे झाल्याचा दावा करतानाच, संबंधित अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याबाबत सरकार विचार करत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. सरकारी जमीन बेकायदेशीररीत्या कोणाच्या ताब्यात जाऊ नये, यासाठीही उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठवाड्यात जात प्रमाणपत्रांसाठी यापूर्वीही शिबिरे घेण्यात आली असून, नियमांनुसार अशा शिबिरांचे आयोजन करणे हे शासनाच्या धोरणाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी समाजाची मागणी अद्याप आपल्यापर्यंत आलेली नसल्याचे स्पष्ट करत, मागणी प्राप्त झाल्यास ती ओबीसी समितीसमोर मांडण्यात येईल, असे बावनकुळे म्हणाले.
नरेंद्र मेहता यांच्या शाळेतील निर्णयावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. शाळेत विविध धर्मांशी संबंधित धार्मिक उपक्रमांची परंपरा असल्याचे सांगत, सध्याच्या निर्णयाची पूर्ण माहिती नसल्याने त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजस्थानमधील दहा महानगरपालिकांच्या निवडणुकीची जबाबदारी आपल्याकडे होती. या सर्व ठिकाणी भाजपचा विजय होईल, असा दावा बावनकुळे यांनी केला. मुंबईतील विमानातील मशिदीसंदर्भातील प्रकरणाची माहिती घेतल्यानंतरच त्यावर भाष्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.