मिरा-भाईंदरमधील शाळेच्या निर्णयावरून संताप; ‘धर्माची बंधने दुसऱ्यांवर लादणे ही हिंसाच’

Image Source:(Internet)
मुंबई : मिरा-भाईंदरमधील भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या शाळेतील एका निर्णयावरून राजकीय वादाला तोंड फुटले आहे. विद्यार्थ्यांनी डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट आणि काही कंदमुळांच्या भाज्या आणू नयेत, अशा सूचनांमुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे. या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला.
आदित्य ठाकरे यांनी या निर्णयावर आक्षेप घेत धर्माच्या नावाखाली दुसऱ्यांवर बंधने लादण्यास विरोध केला. मराठवाडा आणि कोल्हापूरसह विविध भागांत वेगवेगळ्या धर्मांचे लोक एकत्र राहतात, मात्र तेथे अशा प्रकारचे वाद होत नसल्याचे त्यांनी म्हटले.
“जैन धर्म शांततेवर आधारित आहे. प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे. मात्र आपल्या धर्माची बंधने दुसऱ्यांवर लादणे ही हिंसाच आहे,” अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली.
शाळेतील कांदा-लसूण बंदीचा संदर्भ देत त्यांनी हिंदू समाजातील विविध खाद्यपरंपरांचाही उल्लेख केला. आगरी-कोळी समाजाच्या खाद्यपरंपरेपासून ते देशातील विविध राज्यांमधील आहारपद्धतीपर्यंत प्रत्येक समाजाच्या परंपरांचा आदर केला पाहिजे, असे ते म्हणाले.
“प्रत्येकाने आपला धर्म घरात पाळावा, दुसऱ्यावर लादू नये,” असे सांगत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच “हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदुत्वावरच आक्रमण होत आहे, यावर काय बोलणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, मिरा-भाईंदर महापालिकेतील सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा शिंदे गटाचे अमेय घोले यांनी भाजपला दिल्याच्या वक्तव्यावरही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “शिंदे गट त्यांचे गुलाम आहेत. त्यांनी मोठी विधाने करू नयेत,” अशी टीका त्यांनी केली.
शाळेतील आहाराच्या नियमावरून सुरू झालेला हा वाद आता राजकीय पातळीवर पोहोचला असून, भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे लक्ष लागले आहे.