
Image Source:(Internet)
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला आणखी बळ देण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्याची तयारी सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी चित्रनगरी उभारण्यासोबतच मराठी चित्रपटांना अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा तयार करण्यात आल्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
62 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बोलताना फडणवीस यांनी मराठी सिनेमाच्या भविष्यासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली. नव्या चित्रनगरीत चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक अत्याधुनिक तंत्रज्ञान, विविध प्रकारचे सेट्स आणि इतर सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटगृहांचा आराखडाही लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आशय आणि प्रयोगशीलतेमुळे मराठी सिनेमा वेगळा-
मराठी चित्रपटांनी आपल्या आशयपूर्ण कथा, वैविध्यपूर्ण विषय आणि प्रयोगशीलतेच्या जोरावर देशाच्या चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले. मराठी रंगभूमीचीही मोठी परंपरा असून कलाकारांनी तिची प्रतिष्ठा आजपर्यंत कायम ठेवली आहे. याच सांस्कृतिक वारशामुळे मराठी चित्रपटसृष्टी सातत्याने समृद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मान्यवरांचा पुरस्कारांनी गौरव-
या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
याशिवाय ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला. सलीम खान यांच्या वतीने अभिनेत्री हेलन यांनी पुरस्कार स्वीकारला.
हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतकार्याचा गौरव-
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीत स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण संगीतविश्व उभे केले, असे फडणवीस यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वर, वीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर आधारित त्यांच्या संगीतनिर्मितीमधून महाराष्ट्राची संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रभावना प्रभावीपणे व्यक्त झाल्याचे त्यांनी नमूद केले. ‘मोगरा फुलला’, ‘अरे अरे ज्ञाना झालासी पावन’, ‘रुणूझुणू रुणूझुणू रे भ्रमरा’ आणि ‘शिवकल्याण राजा’ यांसारख्या लोकप्रिय रचनांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतक्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले.
सलीम-जावेद यांच्या लेखणीने बदलला हिंदी सिनेमाचा चेहरा-
सलीम खान आणि सलीम-जावेद या जोडीने भारतीय चित्रपटसृष्टीवर मोठा प्रभाव टाकल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ‘जंजीर’, ‘दीवार’ आणि ‘शोले’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी प्रभावी नायक आणि लक्षात राहणाऱ्या व्यक्तिरेखा निर्माण केल्या.विशेषतः अन्यायाविरोधात उभा राहणारा ‘अँग्री यंग मॅन’ हा नायक प्रेक्षकांच्या मनात रुजवण्यात त्यांच्या लेखनाची महत्त्वाची भूमिका असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.