
Image Source:(Internet)
मुंबई : सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. शासकीय विभागांमध्ये रिक्त असलेल्या पदांची माहिती तातडीने संकलित करून भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विशेषतः आदिवासी क्षेत्रातील पेसा अंतर्गत रिक्त पदे सहा महिन्यांच्या आत भरण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मंत्रालयात पेसा क्षेत्रातील रिक्त पदांबाबत झालेल्या आढावा बैठकीत फडणवीस यांनी विविध विभागांना वेळेचे बंधन घातले. अधिसंख्य पदांवर सध्या किती कर्मचारी कार्यरत आहेत, किती कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत आणि त्यांच्या मूळ संवर्गातील किती पदे रिक्त आहेत, याची संपूर्ण माहिती दोन आठवड्यांच्या आत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
सर्व विभागांकडून मिळणारी माहिती मुख्य सचिव कार्यालयाकडे एकत्रित केली जाणार आहे. त्यानंतर उपलब्ध रिक्त पदांवर भरती करण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक नियोजन आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. ठरवून दिलेल्या वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अनुसूचित जमाती प्रवर्गातील नियुक्त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रांच्या पडताळणीचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. २०१९ मधील पडताळणीत वैधता प्रमाणपत्र नसलेल्या सुमारे ६ हजार ८६० कर्मचाऱ्यांची माहिती समोर आली होती. त्यापैकी १ हजार ३४६ पदे भरलेली असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
दीर्घकाळ सेवा बजावलेल्या काही कर्मचाऱ्यांना मानवतावादी दृष्टिकोनातून अधिसंख्य पदांवर सामावून घेण्यात आले होते. आता त्यांच्या स्थितीचा आणि त्यांच्याशी संबंधित मूळ रिक्त पदांचा आढावा घेऊन पुढील भरतीसाठी मार्ग मोकळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
फडणवीसांच्या या आदेशामुळे राज्यातील विविध शासकीय विभागांमधील रिक्त पदांची भरती लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या हजारो तरुणांचे लक्ष आता आगामी भरती प्रक्रियेकडे लागले आहे.