महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा; ठाकरेंच्या १४ आमदारांवर शिंदे गटाची नजर?

    01-Sep-2026
Total Views |
नवरात्रीपूर्वी मोठ्या राजकीय हालचालींचे संकेत; आमदारांना पक्षात आणण्यासाठी तीन मंत्र्यांवर जबाबदारी?

Image Source:(Internet)

नागपूर :
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षफुटीच्या चर्चांना उधाण आले आहे. आगामी नवरात्रीपूर्वी राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे गटातील काही आमदारांना आपल्या गोटात आणण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेसमोरील राजकीय आव्हान आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील तब्बल १४ आमदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी तीन मंत्र्यांवर सोपवण्यात आल्याची चर्चा आहे. कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील या मंत्र्यांकडे संबंधित आमदारांशी चर्चा करून त्यांना शिंदे यांच्या शिवसेनेत आणण्याचे प्रयत्न करण्याची जबाबदारी असल्याचे सांगितले जात आहे.

यातील काही आमदारांना सत्तेत महत्त्वाची पदे आणि चांगली खाती देण्याबाबत आश्वासने दिली जात असल्याची चर्चा आहे. जवळपास पाच आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा असल्याचेही बोलले जात आहे. तर काही आमदारांना महामंडळाचे अध्यक्षपद किंवा राज्यमंत्रिपद देण्याबाबत पक्षांतर्गत पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

या संभाव्य पक्षप्रवेशांना नवरात्रीपूर्वीच वेग आल्यास ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसू शकतो. मात्र, या संदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसल्याने या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

मुंबईच्या महापौरपदासाठीही शिंदे गटाची रणनीती?

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या महापौरपदावरही महायुतीमध्ये हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. महापौरपदाच्या कार्यकाळाबाबत महायुतीमध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. त्यानुसार ठरावीक कालावधीनंतर महापौरपद शिंदे गटाकडे देण्याबाबत भाजपकडून शब्द देण्यात आल्याची चर्चा आहे.

महापालिका निवडणुकीनंतर महायुतीच्या बैठकीत या पदाबाबत चर्चा झाली होती, असा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरणे आणि महापौरपदासाठी शिंदे गटाची तयारी याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

खासदारांनंतर आता आमदारांचीही फोडाफोडी?
काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेला साथ दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून आलेल्या या खासदारांनी नंतर शिंदे गटाची वाट धरली. त्यानंतर संसदेत स्वतंत्र गट स्थापन करण्याचीही प्रक्रिया झाल्याची चर्चा होती.

आता खासदारांनंतर आमदारांमध्येही फूट पाडण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चेने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. आगामी काळात किती आमदार शिंदे गटाच्या संपर्कात येतात आणि प्रत्यक्षात पक्षप्रवेश होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या राजकीय घडामोडींवर उद्धव ठाकरे कोणती रणनीती आखतात आणि संभाव्य पक्षफुटीला रोखण्यासाठी कोणती पावले उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.