
Image Source:(Internet)
जालना : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू असून, आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचे नेते आणि माजी आमदार शाहजीबापू पाटील यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली.
यावेळी शाहजीबापू पाटील यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांचे चरणस्पर्श करून उपोषणाला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर टीका करताना शाहजीबापू पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्यांना विरोध केला जात असल्याचा आरोप केला. "मराठ्यांना काही मिळायला लागलं की लगेच विरोध केला जातो. आम्हा मराठ्यांना कोणाचे उष्टे खाण्याची सवय नाही, तरीही आमचा विरोध केला जातो," असे ते म्हणाले.
यावेळी शाहजीबापू पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना दूरध्वनी करून मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची माहिती दिली. तसेच परिस्थिती गांभीर्याने घेत तातडीने योग्य निर्णय घेण्याची मागणी केली.