
Image Source:(Internet)
रायगड : रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे रोह्याचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
पालकमंत्री भरत गोगावले आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत पोटफोडे यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी त्यांच्या समर्थकांसह रोहा शहर व परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
तटकरे यांचा प्रभाव असलेल्या रोहा परिसरात झालेल्या या पक्षांतरामुळे स्थानिक राजकारणाची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. पोटफोडे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक संघटनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आगामी काळात रोहा शहरातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, या पक्षांतराचा राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या स्थानिक ताकदीवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.